'वर्डप्रेस' ही एक मुक्तस्त्रोत प्रणाली आहे. जिचा वापर प्रामुख्याने ब्लॉग बनवण्याकरिता केला जातो.मात्र ती केवळ ब्लॉगपुरता मर्यादित नाही. वर्डप्रेसचा वापर करुन तुम्ही काही वेगळ्या स्वरुपाची संकेतस्थळे ही बनवू शकता.वर्डप्रेसची ओळख करुन घेण्यापुर्वी आपण ब्लॉग म्हणजे काय हे लक्षात घेऊ.
ब्लॉग म्हणजे काय?
ब्लॉगचा(Weblog) जन्म 'डायरी' प्रमाणे रोजचे रोज अद्ययावत केले जाणारे संकेतस्थळ' अशा संकल्पनेतून झाला. ब्लॉगमधे साधारणपणे सर्वात नविन लेखन पहील्या पानावर किंवा पानाच्या सर्वात वर अशा स्वरुपात असते. ब्लॉगमधे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या श्रेणी(Category) तयार करुन त्यात लेखन करता येते. तसेच हे सर्व लेखन तारीख्/महीना/ वर्षा नुसार एका लेखागारात(Archive) साठवून ठेवता येते. व या लेखनावर वाचकांच्या प्रतिक्रीया जाणून घेता येतात. हे लेखन वाचक 'फिड्'द्वारा थेट त्याच्या ई-पत्त्यावर मिळवू शकतो. इतरांच्या ब्लॉगच्या फिडचा वापर करुन तुम्ही त्यांच्या ब्लॉगवरील लेखन तुमच्या ब्लॉगवर देखील दाखवू शकता. यु-ट्यूबसारख्या संकेतस्थळांवरचे विडीओ तुमच्या ब्लॉगवर दाखवू शकता. थोडक्यात काय तर एखाद्या संकेतस्थळावर असणार्या सेवा ब्लॉगमधे देऊ शकता.
काही महत्वाचे फायदे?
- वर्डप्रेस ही मुक्तस्त्रोत प्रणाली असल्यामुळे ती मोफत मिळते. शिवाय वर्डप्रेसशी निगडीत अनेक गोष्टी ही मोफत मिळतात.(जसे की थीम्स,प्लगीन्स,विजेट्स व काही प्रोग्रॅम्स)
- वर्डप्रेस वापरण्यास अत्यंत सोपे आहे. प्रोग्रॅमींग लँग्वेजची माहीती नसलेली व्यक्तीही वर्डप्रेसचा वापर सहजतेने करु शकते.
- वर्डप्रेसच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण ब्लॉग नियंत्रीत करता येतो.
- एक अथवा अनेक जण एकाच ब्लॉगवर लेखन करु शकतात.
- ब्लॉगच्या सदस्यांना नियंत्रीत करता येते.
- ब्लॉगवर मिळणार्या प्रतिसादांवर नियंत्रण ठेऊ शकता.(जसे की एखाद्या ठरावीक वाचकाला प्रतिसाद देण्यापासून रोखू शकता.)
- ब्लॉगवर जाहिराती दाखवू शकता.
- ब्लॉगची थीम/रंग सहजपणे बदलू शकता.
- सर्च इंजीनला(गुगल,याहू) तुमच्या ब्लॉगमधील बदल कळवू शकता.
वर्डप्रेसचा वापर करण्यतील सुलभता लक्षात घेण्यासाठी तुम्ही वर्डप्रेस.कॉम इथे भेट द्या. इथे तुम्ही मोफत ब्लॉग बनवू शकता. मात्र वर्डप्रेस.कॉम वरील काही सेवा मर्यादीत स्वरुपातील आहेत. वर्डप्रेसच्या नियंत्रण कक्षाचा वापर करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्यास त्या तुम्ही इथे प्रतिसादात विचारु शकता.
वर्डप्रेस कुणासाठी?
वर्डप्रेसचे आजचे स्वरुप पाहता ते केवळ ब्लॉगकरिता नव्हे तर मर्यादीत स्वरुपातील सेवा देणारे संकेतस्थळ बनवण्याकरिता ही वापरता येऊ शकते.वर्डप्रेसचा वापर करुन तुम्ही वैयक्तिक, सामूदायिक, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या प्रकारची संकेतस्थळे बनवू शकता.
वर्डप्रेसचा वापर करुन बनवली गेलेली काही संस्थळे:
रेवॉल्यूशन मॅगेझीन(थीम डेमो साईट)
वर्डप्रेस रिमीक्स(थीम डेमो साईट)
अर्थेमीया प्रिमीयम(थीम डॅमो साईट)
रेवॉल्यूशन ऑफीस(थीम डेमो साईट)
रेवॉल्यूशन व्हाईट कॅनवास-फोटो ब्लॉग्(थीम डेमो साईट)
वरील सर्व डेमो आहेत व या थीम मोफत मिळत नाहीत परंतू यावरुन वर्डप्रेसचा वापर किती वेगवेगळ्या स्वरुपात करता येऊ शकतो याचा तुम्हाला अंदाज येईल.
आजपर्यंत वर्डप्रेस वापरु इच्छिणार्या मराठी भाषीकांना एक मुख्य अडचण जाणवत होती ती म्हणजे मराठी टंकलेखन कसे करायचे? कारण वर्डप्रेसचा वापर युनिकोड फॉन्टसाठी करताना वर्डप्रेसमधे काही बदल करणे आवश्यक असते. लोकायतद्वारा यासारख्या अडचणींवर आपल्याला उत्तरे मिळतील. याशिवाय वर्डप्रेसचे मराठी भाषांतर आजपर्यंत उपलब्ध नव्हते. लोकायतद्वारा वर्डप्रेसचे मराठी भाषांतरांचे पहील्या टप्प्यातील काम पुर्ण झाले आहे. लवकरच ते आपल्याकरीता मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल.
वर्डप्रेसबाबतीतले काही प्रश्न आपल्या मनात असतील तर ते आपण इथे प्रतिसादात विचारु शकता.
पुढील भागात आपण वर्डप्रेसची प्रस्थापना(Installation) करण्यापुर्वी काय बदल आवश्यक आहेत आणि त्यानंतर प्रस्थापना कशी करावी याबद्दल माहीती घेऊ.
वर्डप्रेसची आणी त्या अनुषंगाने करुन दिलेली ब्लॉगची ओळख आवडली.
मराठीतल्या वर्डप्रेसची प्रस्थापना पहाण्यासाठी उत्सुक आहे.
वर्डप्रेसबद्दल लेख वाचून आनंद झाला. वर्डप्रेसच्या थिम्स खुप सुंदर असतात. अश्याच काही सुंदर थीम्स बद्दल माहिती देता आली तर बघा. तसेच ह्या पुर्वनिर्मीत थीम्स मध्ये काहि सुधारना करायची असल्यास तसे काही शक्य आहे का?
नीलकांत
छान ओळख करून दिली आहे. पण वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट मधील सुविधांची तुलना केल्यास काय चांगले राहिल? या बद्दल पण कळून घ्यायची इच्छा आहे.
बिपिन.
पुर्वनिर्मीत थीम्स मध्ये काहि सुधारना करायची असल्यास तसे काही शक्य आहे का?
हो, या थीम्सबरोबर त्यांचा वापर करण्यासंबंधीची पुस्तीका ही मिळू शकते किंवा त्या थीम्स बनवणार्या संस्थेच्या संकेतस्थळावर तशी मदत मिळते. वरील थीम्स या मोफत नाहीत.व त्या विकत घेणे सामान्य ब्लॉगरला कितपत परवडेल याबाबत ही शंका आहे. तरीही वर्डप्रेसचा अवाका समजावून सांगण्यासाठी या थीम्सबद्दल इथे माहीती दिली. मात्र गुगलवर शोध घेतला तर अशा हजारो मोफत थीम्स मिळू शकतात.स्टाईलशीटद्वारे अशा थीम्सची रंगसंगती,वापरलेल्या प्रतिमा किंवा थीमच्या आकारात बदल केला जाऊ शकतो. त्याबद्दलची माहीती पुढे येईलच.
वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट मधील सुविधांची तुलना केल्यास काय चांगले राहिल?
माझ्या मते वर्डप्रेस(वर्डप्रेस.ऑर्ग) हे उत्तम आहे. कारण ते मुक्तस्त्रोत असल्याने त्याच्याशी संबंधीत प्लगीन्स, विजेट्स आणि थीम्स ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात.तुम्हाला त्यात हवे ते बदल करण्याची मुभा आहे.वर्डप्रेस प्रणाली तुम्ही कुठल्याही सर्व्हरवर प्रस्थापीत करता येते. ब्लॉगरची अशा प्रकारची कुठलीही प्रणाली उपलब्ध नाही. ती तुम्हाला ब्लॉगरच्या सर्व्हरवरच वापरावी लागते.
ब्लॉगरची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याची सुरक्षितता! ब्लॉगर हि गुगलची शाखा असल्याने त्याच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याचे कारण नाही.
धन्यवाद.
वर्डप्रेस बद्दल सुरूवातीची माहिती देणारा लेख आवडला, वर्डप्रेस मध्ये ब्लॉग कसा बनवायचा हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे.