मुक्तस्रोत सॊफ्टवेअर भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहेत.या ठिकाणी आपण त्यांची तोंड ओळख करून घेऊयात.
मुक्तस्रोत सॉफ्टवेअर म्हणजे ज्या सॉफ्टवेअरचा स्त्रोत हा सर्वांना वाचायला आणि त्यात बदल करायला खुला आहे.
हे सॉफ्टवेअर लोकांना बहुतांश मोफत उपलब्ध असतात. त्यांचा स्रोत खुला असल्यामुळे आपल्याला हवा तो आणि हवा तसा बदल या सॉफ्टवेअर मधे आपल्याला करून घेता येतो. एवढेच नाही तर हे सॉफ्टवेअर आपण आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना सुध्दा देऊ शकतो,
मुक्तस्त्रोत (Open source - उच्चारी ओपन सोर्स) ही सॉफ्टवेअर विकसनाची जगविख्यात पद्धत आहे. ही पद्धत वापरुन विकसित केलेले सॉफ्टवेअरचा स्त्रोत हा अभ्यासासाठी किंवा बदलासाठी खुला असतो. पण मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर म्हणजे फक्त खुला स्त्रोत नव्हे तर मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचे वितरण हे खालील गोष्टींना धरुन असते.
१. मुक्त पुनर्वितरण:
मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचे पुनर्वितरण करतांना त्यावर प्रताधिकाराची कोणतीही बंधने (जसे रॉयल्टी) नसावीत. वितरण फक्त ते सॉफ्टवेअर किंवा इतर काही सॉफ्टवेअर्स बरोबर पण असु शकते.
२. स्त्रोत:
वितरण करतांना स्त्रोत उपलब्ध असावाच, तसेच त्याच्या वापरण्यायोग्य कंपाईल केलेल्या बायनरीज पण असाव्यात. यासाठी कोणताही आर्थिक मोबदला अपेक्षित नसावा. जर वितरण डिव्हीडी सारख्या माध्यमाने होत असेल तर त्या माध्यमासाठी लागलेली उत्पादन किंमत घेतली जाउ शकते.
३. बदलाची मुभा:
उपलब्ध स्त्रोतात बदल करण्याची मुभा असावी तसेच ते मुळ मुक्तस्त्रोत परवान्याला पालन करणारे असावे.
४. मुळ लेखकाचा स्त्रोत (Source Code):
मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचे पुनर्वितरण करतांना त्यात काहीही बदल झालेले नसल्यास ते मुळ लेखकाच्या नावानेच वितरित व्हावेत.
५. भेदभाव नसावा:
मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचे वितरण करतांना दिलेला परवाना कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिंच्या समुहाला भेदभावाने वापराचा अधिकार नाकारणारा नसावा.
तसेच ते कोणत्याही खास क्षेत्रासाठी सिमीत नसावे.
६. परवान्याचे वितरणः (Distribution of License)
मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचे पुनर्वितरण करतांना त्याबरोबर मुळ परवानाच वितरीत केला जावा, तसेच नविन परवाना काढण्याची गरज नसावी.
७. परवाना हा एखाद्या विशिष्ठ सॉफ्टचेअरसाठीच किंवा विशिष्ठ सॉफ्टचेअरच्या संचाबरोबरच वितरीत करण्यासाठीच नसावा.
८. परवाना दुसर्या कोणत्या सॉफ्टवेअर्सच्या वापरावर निर्बंध घालणारा नसावा.
९. परवाना तंत्रज्ञान मुक्त असावा, तो कोणत्याही विषिष्ठ तंत्रज्ञानाशी बांधील नसावा. (Technology-Neutral)